मुंबई (संपादक सुनिल पाटील) । लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेच्या नावाला या तोतया पत्रकारांनी तडा दिला आहे. प्रतिष्ठित मीडिया चॅनलची नावे पुढे एखादा शब्द जोडून नवीन अकाउंटस तयार केली जातात आणि या ‘विश्वसनीय’ वाटणाऱ्या नावांच्या आडून फसवणूक केली जाते.
बनावट सोशल मीडिया पत्रकारांचा दहशतवादी कारभार वाढू लागला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर खोट्या नावाने पत्रकारिता करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. काही व्यक्ती प्रतिष्ठित न्यूज चॅनलच्या नावासारखी पेजेस व चॅनेल्स तयार करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि बार, लेडीज बार तसेच नाईट क्लबमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करून पैसे उकळत आहेत.हे बोगस पत्रकार पोलीस ओळखीचा धाक दाखवून बार मालक व ग्राहकांकडून पैशांची उघड मागणी करतात. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याच्या, किंवा चॅनेलवर टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात.
तथाकथित हे मोबाइल पत्रकार इतरांकडून व्हायरल झालेले व्हिडिओ डाउनलोड करून त्यावर स्वतःचा चॅनल लोगो लावतात व स्टिंग ऑपरेशनच्या नावाने पैसे मागतात. पैसे न मिळाल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकार अधिक होत असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.







