- ३४५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांकडून ३६ शस्त्रे जमा
पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ,प्रशासन सज्ज असून, निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी 345 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केले आहे.
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व पंढरपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी १५ पोलीस अधिकारी, २१० पोलिस अमंलदार व १२६ होमगार्ड तसेच एक एसआरपीएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या ११२ जणांना पोलीसांनी तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले आहेत .त्याचप्रमाणे संरक्षणासाठी दिलेल्या शस्त्रांचा गैरवापर होऊ नये, यासाठी शहरातील शस्त्र परवाना धारकांकडून 36 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच उपविभागात विविध गुन्हे दाखल असलेल्या ९ सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करत कारवाई करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डगळे यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाकडून मतदान केंद्राची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच निवडणूक पूर्व व निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री घोडके यांनी दिली.त्याशिवाय नाकाबंदीत संशयीत वाहनांची झडाझडती घेण्यासह, फिरत्या पथकांमार्फत देखिल गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.







