ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ४१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एक अग्नीशस्त्र आणि एक जिवंत काडतुसाचा समावेश आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अमली पदार्थ विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेतंर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, ठाणे गुन्हे शाखा शोध २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पथकाने १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा आणि एक अग्नीशस्त्र आणि एक जिवंत काडतुस असा एकूण ११ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत आकिब इकबाल बागवान (३३) आणि भरत शत्रुध्न यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशी करण्यात आली कारवाई कल्याण पूर्व येथील हाजीमंलग रोड जवळील एका सोसायटीत आकिब इकबाल बागवान हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात सापळा रचला. या सापळ्यात आकिबकडे १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचा १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मफेड्रोन हा अंमली पदार्थ आणि ५० हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र विनापरवाना बाळगल्याचे आढळून आले.
आकिब याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी हा आरोपी सारईत गुन्हेगार असून त्याच्यावर कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्याची चौकशी केली असता, अग्नीशस्त्र त्याने भरत शत्रुध्न यादव याचेकडुन घेतल्याचे सांगितले. त्यावेळी अधिक तपास करुन भरत शत्रुध्न यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.







