मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । कांदिवली परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडानी थेट हल्ला चढवल्याचे समोर आले आहे. पोलिसांना यावेळी मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरात घडली.
कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी स्थानिक गुंडानी पोलिसांवरच हल्ला केला.
या घटनेनंतर कांदिवली पोलीसांनी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.







