शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) । पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ गायकवाड (F.Y.B.A) याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या या यशाबद्द्ल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून, त्याची श्रीरामपूर येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये एफ.वाय.बी.ए. वर्गात शिकणाऱ्या पार्थ गायकवाड याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे आणि कष्टाचे प्रदर्शन करत स्पर्धेत दुसरा क्रमांक (Silver Rank) मिळवला.
आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड
पार्थच्या या शानदार कामगिरीमुळे त्याची श्रीरामपूर येथील सी. डी. जैन महाविद्यालयात होणाऱ्या ‘आंतरविभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी’ (Inter-Zonal Competition) निवड झाली आहे. या आगामी स्पर्धेतही तो महाविद्यालयाचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पार्थ गायकवाड याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी व साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळ सचिव विलासराव वाणी, सहसचिव बाबासाहेब अनर्थे, संभाजी कोते यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धेतील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पार्थच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.







