पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । येथील तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या बंदमुळे पंढरपूर तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संपामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान _काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध कागदपत्रे मिळत नाहीत. शेतक-यांसह पंढरपुरातील नागरिकांना कर्ज किंवा वैद्यकीय मदतीसाठी व इतर कारणांसाठी लागणारे जमिनीचे उतारे मिळत नाहीत. तसेच शासनाच्या विविध योजनांसाठीची कागदपत्रेही मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेची सर्व कामे खोळंबली आहेत. तरी शासनाने तातडीने या आंदोलनकत्यांच्या मागण्या मान्य करून हे आंदोलन थांबवावे.
– गणेश अंकुशराव,
संस्थापक अध्यक्ष, महर्षी वाल्मिकी संघ
हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्र्यांनी विना चौकशी एक उपजिल्हाधिकारी, चार तहसीलदार, चार मंडलाधिकारी यांचे निलंबन केले. याप्रकरणी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून (दि. १६) बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे पंढरपूर तहसील कार्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसत आहे.
निलंबन रद्द करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच नवीन नियुक्त तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर मिळावेत. या मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. याची दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयासह सेतू, पुरवठा विभाग अशा सर्व विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. याचा फटका पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.







