जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्या निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जळगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत (MIDC) मधील सर्व सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अग्निशमन विभाग तसेच जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक यांच्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या सहकार्याने टेबल टॉप मीटिंग, मॉकड्रील व रासायनिक आपत्ती विषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यात सकाळी ११ ते दुपारी १ आर. जे. फूड्स, एमआयडीसी, जळगाव येथे टेबल टॉप मीटिंग आयोजित करण्यात आली. या सत्रात औद्योगिक आस्थापनांमधील विविध प्रकारच्या आगी, संभाव्य धोके, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसेच समन्वय व नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुपारी २ ते ४ भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL), MIDC, जळगाव येथे मॉकड्रील आयोजित करण्यात आली. या मॉकड्रीलच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थितीत आग नियंत्रण, बचाव कार्य, समन्वय व प्रतिसाद वेळ यांची चाचणी घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव, पोलीस निरीक्षक, जळगाव, जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक, जळगाव, उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव, अग्निशमन अधिकारी, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव, NDRF, पुणे येथील प्रमुख पोलीस निरीक्षक, BPCL चे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच इतर औद्योगिक व नागरी भागात उद्भवू शकणाऱ्या आगी व रासायनिक आपत्तींसारख्या संकटांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण, मॉकड्रील व विभागांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे.







