जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जळगाव विमानतळावरून मुंबईसह पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि गोव्यासाठी नियमित सेवा पुरवली जात आहे. साहजिकच अलीकडील काळात या विमानतळाचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे असताना, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची अचानक धमकी मिळाल्यानंतर संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांची पळापळ झाली.
जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोध व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली. घटनास्थळी श्नान पथकही दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी; औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी तातडीने सर्व नियमित कामे सोडून विमानतळावर हजर झाले.
मात्र, काही वेळानंतर खरा काय तो प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विमानतळासारख्या संवेदनशील क्षेत्राला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगाने हे सखोल आणि व्यापक मॉक ड्रिल यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.
विविध यंत्रणांमधील समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि निर्णय प्रक्रिया किती प्रभावी आहे, याचीही यावेळी कसून चाचणी घेण्यात आली. मॉक ड्रिलदरम्यान कोणतीही घाई गडबड किंवा गोंधळ न होता सर्व यंत्रणांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही केली. वेळेचे काटेकोर पालन, स्पष्ट संवाद व्यवस्था आणि जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन यामुळे संपूर्ण सराव यशस्वी ठरला. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा बंदोबस्त तसेच आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.







