बीड (प्रतिनिधी) । लग्नाचं आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात मुलींच्या सुरक्षेविषयी चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीची ओळख अभिषेक सुखदेव मोटे (वय २२ वर्ष, रा. उदंड वडगाव, ता. बीड) या तरुणाशी झाली. अभिषेक हा देखील त्याच शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर अभिषेकने तिला लग्नाचं आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.
विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला बीड शहरातील एका कॅफेमध्ये नेले. तसेच बीड तालुक्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. वारंवार होणाऱ्या या प्रकारानंतर पीडित मुलीने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी अभिषेक मोटे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







