शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधक ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचा पिंपळनेर येथे नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपळनेर मंडळाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
ह.भ.प. रविकिरण महाराज हे आपल्या ओघवत्या शैलीतील कीर्तनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपळनेर भेटीदरम्यान त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी दिलीप घरटे यांनी महाराजांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना दिलीप घरटे यांनी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “रविकिरण महाराजांचे कीर्तन केवळ मनोरंजन नसून ते समाजाला नवी दिशा देण्याचे काम करते. वारकरी संप्रदायाची परंपरा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत.” यावेळी स्थानिक नागरिक, भाविक आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







