नायलॉन मांजाला पूर्ण बंदी; पक्षी, प्राणी व नागरिकांचे प्राण धोक्यात… प्रशासनाची कठोर कारवाईची तयारी

नायलॉन मांजा

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । येत्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाने नायलॉन मांजा च्या विक्री, साठा आणि वापरावर कठोर बंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. पतंगबाजीच्या मोसमात सर्वाधिक जीवितहानी घडवणारा नायलॉन मांजा पक्ष्यांच्या गळ्यात अडकून त्यांचे मृत्यू, तसेच मानवाला गंभीर दुखापती होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. याच धोक्याची जाणीव ठेवत प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नायलॉन मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे हात-पाय, मान आणि चेहरा कापल्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच आकाशात झेपावणाऱ्या पक्ष्यांचे पंख मांजात अडकून गंभीर जखमी होणे किंवा मृत्यू ओढवण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवत त्वरित बंदीची मागणी केली होती.
आदेशानुसार, शहरात कोणत्याही दुकानात नायलॉन / चायनीज मांजाची विक्री आढळल्यास दुकानमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच साठा जप्त करून तात्काळ नष्ट करण्यात येणार आहे. नागरिकांनीही अशा सामग्रीचा वापर टाळावा आणि दिसल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पर्यावरणपूरक पारंपरिक सूती मांजा वापरण्याचे आवाहन समाजसेवी संस्था, पक्षीप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. “सण साजरा करा – पण जीव धोक्यात घालू नका”, असे आवाहन करत जनजागृती मोहीमही राबवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here