पुणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) । महान कामगार नेते शहीद दादा रूपमय चटर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी शहीद दादा रूपमय चटर्जी चौक, भोसरी, पुणे येथे TUCC सेंट्रल ट्रेड युनियन संलग्न सर्व संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेस TUCC सेंट्रल कमिटीचे अध्यक्ष श्री. के. इंदु प्रकाश मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी TUCC महाराष्ट्र राज्य समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, युनियनशी संलग्न विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शहीद दादा रूपमय चटर्जी यांनी कामगार वर्गासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. त्यांनी कोलकाता व पुणे येथील गोळाबारूद निर्माणीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांची स्थापना करून कामगारांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. तसेच असंघटित क्षेत्रातील विविध कामगारांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. शहीद दादा रूपमय चटर्जी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या त्याग, तपस्या, बलिदान व विचारसरणीवर आधारित कार्य करणारे नेते होते. कामगारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष करत असताना ३१ डिसेंबर १९८३ रोजी ते अपघातग्रस्त झाले व ६ जानेवारी १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.
दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी सप्ताहात विविध सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते. याच परंपरेनुसार यावर्षीही सर्व संघटनांच्या वतीने अनाथाश्रमांना मदत, रक्तदान शिबिर, तसेच विविध सामाजिक शिबिरे आयोजित करून स्मृती सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी व कामगारांनी शहीद दादा रूपमय चटर्जी यांच्या विचारांना पुढे नेण्याचा व कामगार हितासाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.







