ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । सातबारा उतारा हा विक्रांत दत्तात्रय आंब्रे कुटुंबाच्या नावावर आहे. मात्र नकाशा हा निसार इब्राहिम परकार व तुकाराम जयराम कदम कुटुंबाच्या मालकीचा आहे. अशा परिस्थितीत, सातबारा आणि नकाशा यामध्ये स्पष्ट तफावत असताना देखील खरेदीखत येथे दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नियमबाह्य खरेदी-विक्री करण्यात आलेली आहे.
दुय्यम निबंधकांनी सातबारा व नकाशा यांची पडताळणी न करता खोटी व बेकायदेशीर नोंदणी केली आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून माळी कुटुंबाचे नाव बेकायदेशीररीत्या नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणात तहसीलदार यांच्याकडे सर्व दस्तावेज व न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही आजपर्यंत सदर नावे कमी करण्यात आलेली नाहीत, ही गंभीर बाब आहे.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन :
न्यायालयाच्या आदेशाचे सरळसरळ उल्लंघन करण्यात आलेले असून, अपर तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक कोर्टाच्या आदेशाचे पालन केलेले नाही. याव्यतिरिक्त, पोलीस संरक्षण घेऊन बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यात आली तसेच दस्तावेजधारक परकार व कदम कुटुंबीयांना त्यांच्या मालमत्तेतून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी “तुम्हाला जेलमध्ये टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. म्हणून, संबंधित अपर तहसीलदार व त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.







