पाकिस्तानने कारवाईच्या भीतीने दिली पहिल्यांदा कबुली.
इस्लामाबाद – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याची कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानने विविध दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. या यादीत दाऊदचेही नाव आले असून, यामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.
दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कारणावरून एफएटीएफने पाकिस्तानला 2018 मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा इम्रान सरकारचा प्रयत्न असून त्याअनुषंगाने विविध दहशतवादी संघटना आणि त्याच्या 88 म्होरक्यांवर आर्थिक निर्बंध घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार संबंधितांची सर्व प्रकारची मालमत्ता आणि बँक खाती सील होणार आहे. यात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उल दावाचा संस्थापक हाफिज सईद, जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, तालिबानी, हक्कानी नेटवर्कसह इतर काही दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचा समावेश आहे.
दरम्यान, 1993च्या बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये पळ काढलेला दाऊद इब्राहिम देशात नसल्याचे पाकिस्तान आतापर्यंत सांगत आला आहे. मात्र, आपली छबी सुधारण्याच्या प्रयत्नात केलेल्या या कारवाईत दाऊदचे नाव आल्याने पाकची पुरती फजिती झाली आहे.







