अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
मोरया गोसावींचे वडील वामनभट्ट शाळिग्राम यांनी मोरगावला कठोर तपश्चर्या केली. म्हणून मयूरेश्वर स्वत: त्यांचा मुलगा बनला. तेच पुढे मोरया गोसावी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी मोरगावची वारी सुरू केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन मोरया चिंचवडला मंगलमूर्ती बनून आले. मोरगावला थोर गणेश भक्त गणेश योगीन्द्र यांनी चोवीस वर्षे मोरयाची सेवा केली. त्यांचा मोरगावात मठ आहे. त्यांनी गणेश संप्रदायाचा प्रचार व प्रसार चालू केला. गणेश संप्रदायाच्या वाङ्मयाचे संकलन, संपादन, प्रकाशन या सारखी अनेक कामे या मठाने केली.
श्रीगणेशाची प्रथम स्थापना झाली ते हे मोरगाव क्षेत्र. श्रीमयूरेश्वरापुढे नंदिकेश्वर आहे. हे मोरगावच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मोरगाव येथे कऱ्हा नदी आहे. कऱ्हेमध्ये स्नान केले की द्वारयात्रेचे फळ मिळते. मंदिरात देवळाच्या जवळ गाभाऱ्याबाहेर श्रीनग्नभैरवाचे छोटे देऊळ आहे त्याचे प्रथम दर्शन घ्यावे व मग गणेशाचे दर्शन घ्यावे. मंदिरात मुख्य देवळाच्या बाजूने ओवऱ्या आहेत. यात मुद्गल पुराण या गणेश संप्रदायाच्या महान ग्रंथाप्रमाणे आवरण देवतांची मांडणी आहे. यात अष्टविनायक व इतर देवता आहेत. या आवरण देवतांची विशिष्ट क्रमाने पूजा करावी आणि दर्शन घ्यावे अशी परंपरा आहे. यास नित्य यात्रा म्हणतात.
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.
असा हा अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर.







