सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | वडूज व परिसरातील बनावट डीएपी खत प्रकरणात प्रशासनासमोर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या चुलीत माती ओतणाऱ्या भेसळखोरांना अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळेला सर्व शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून अनिल पवार यांनी घेतलेल्या कडवट भूमिकेच कौतुक करण्यात आलं. वडूज मधील बनावट डीएपीच्या प्रकरणाचे धागेदोरे पश्चिम महाराष्ट्र मध्ये पसरले आहेत . स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कृषी विभागाने संयुक्तपणे या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे. मात्र बनावट खत प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी चौकशीवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या असून, हा प्रकार शेतकऱ्यांच्या भवितव्याशी थेट खेळ करणारा असल्याचे स्वाभिमानीने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात प्रशासनासमोर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणताही हस्तक्षेप करू नयेत. दोषींवर कायद्याने कारवाई होऊ द्यावी. जर कोणी दबाव आणून भेसळखोरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संबंधितांच्या दारात जाऊन बोंबाबोंब आंदोलन करेल,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासनाने दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी खत नियंत्रण आदेश 1985 व आवश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, दोषी विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत, साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
बनावट खत विक्रीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व भवितव्यावर गंभीर परिणाम झाला असून, या प्रकरणात राजकीय दबाव न ठेवता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.







