अहिल्यानगर (प्रतिनिधी तुषार महाजन) । महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामविकासात पतसंस्था चळवळीचा मोठा वाटा असून त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्ज मिळत असल्यामुळे बेरोजगारांना मोठा व्यवसाय उभा राहिला. त्या माध्यमातून शहरी व ग्रामीण अर्थकारणाला देखील मोठा हातभार लागलेला आहे. हे जरी खरे असले तरी वेळेवर कर्ज फेडणे पतसंस्था चळवळीसाठी फायदेशीर बाब ठरत असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश गंगवाल यांनी एका कार्यक्रमात केले.
सतीश गंगवाल म्हणाले की, पतसंस्था कर्जदाराची पत पाहून त्याबरोबर योग्य ती कागदपत्रे व जामीनदार याची खात्री करून अवघ्या काही तासांत कर्जदाराला कर्ज उपलब्ध करून देत असतात. मात्र काही थकीत कर्जदारांमुळे पतसंस्था चळवळीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळा कायदेशीर कारवाईचा देखील अवलंब करावा लागतो. मात्र असा निर्णय घेताना ठेविदाराचे हित देखील बघावे लागते. हे सांगताना शासनाने देखील थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणखी कडक केल्यास त्याचा देखील फायदा पतसंस्था चळवळीसाठी हिताचा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाने त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने काही सकारात्मक निर्णय देखील घेतलेले आहेत. मात्र त्यापुढे जाऊन अजूनही काही कठोर नियमावली केली तर कमी कालावधीत थकीत कर्ज वसूल झाले तर पतसंस्था चळवळ आणखी गतिमान पद्धतीने वाटचाल करू शकते.
आता बाजारपेठेत आर्थिक गतिमानता येत असल्याने व्यवसाय कुठलाही असला तरी काटकसर, वेळेचे महत्त्व यासोबतच ग्राहकांना चांगली सेवा देण्यात यश मिळाले तर व्यवसायात आणखी चांगल्या पद्धतीने यश मिळू शकते. त्यासाठी आर्थिक व्यवहार चांगल्या पद्धतीने केले तर व्यवसायिकांबरोबरच कामगार व बाजारपेठेत देखील खात्रीशीरपणे गतिमानता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी नुकताच संपन्न झालेल्या ग्राहक मेळाव्यात बोलताना दिला.
यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महेंद्र कोटस्थाने, संचालक संजय संकलेचा, किशोर गंगवाल, मंगेश गंगवाल, रत्नमाला राका, पुंजा घोडे, संजय दुशिंग, प्रतिक्षा जगताप, सुमन व्यवहारे, व्यवस्थापक गोरक्ष दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.







