ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । कल्याण केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगितल्यामुळे एका कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले. शहरातील वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जखमी पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शनिवारी रात्री दुर्गाडी चौक येथे वाहतूक पोलीस कर्मचारी विलास भागीत हे आपले कर्तव्य बजावत होते. रात्री १० वाजेच्या सुमारास जेव्हा चौकात वाहनांची मोठी कोंडी झाली होती, तेव्हा विलास भागीत यांनी एका कारला वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येताना पाहिले जेव्हा त्यांनी कार थांबवून चालकाला विचारणा केली आणि विरुद्ध दिशेने गाडी आणण्याचे कारण विचारले, तेव्हा कारमधील व्यक्तींनी कायद्याचा सन्मान करण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर गोंधळ वाढताना पाहून चारही आरोपी तिथून पसार होण्यात यशस्वी झाले जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.







