बारामती (वृत्तसंस्था) । चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणातला दादामाणूस म्हणून लोकप्रिय असणारे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज काळाच्या पडद्याआड गेले. अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीकडे निघाल होते. बारामतीमध्ये लँडिग होत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
बारामतीच्या काटेवाडीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महानायक होते. काका शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवत अजित पवारांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. बारामतीचे आमदार, खासदार ते राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली.
आपल्या बिनधास्त स्टाईलने फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरम करणारे, कार्यकर्त्यांची फिरकी घेणारे अजित पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दादांनी घेतलेल्या या अकाली एक्झिटने बारामतीकरांसह राजकीय नेत्यांनाही अश्रु अनावर झाले. अत्यंत उमद्या वयाचा, तरुण तडफदार आणि आपल्या कामामुळे अवघ्या राज्यात लोकप्रिय असलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख होती.

अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवारांसह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक, सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे.







