वडोदरा (वृत्तसंस्था) । शहरात दारू पिऊन गाडी चालवून तीन वाहनांना धडक दिल्याप्रकरणी माजी भारतीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पहाटे सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास वडोदरामधील अकोटा परिसरातील पुनीत नगर येथे घडली. जेकब मार्टिन त्याची SUV चालवत असताना दारूच्या नशेत होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन गाड्यांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर संबंधित वाहनमालकांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी जेकब मार्टिनला ताब्यात घेतले. त्याची कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
जेकब मार्टिन यापूर्वीही कायदेशीर अडचणीत सापडला आहे. २०११ साली त्याला मानवी तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा संबंध दिल्लीशी होता. जेकब मार्टिनने १९९९ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात प्रवेश केला होता. तसेच, दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधीही त्याला मिळाली होती. त्याने भारतासाठी एकूण १० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ८ डावांत त्याने १५८ धावा केल्या असून त्याची सरासरी २२.५७ इतकी होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३९ होती. २००१ साली केनियाविरुद्ध खेळलेला सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.







