अमरावती (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजनात देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने तब्बल १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.२४) उघडकीस आली. या प्रकरणी एका पालकाने मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून करार रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, खिचडी पुरवठा करणारा कंत्राटदार व शालेय पोषण अधीक्षक हे या प्रकरणास जबाबदार आहेत. शहरातील काही शाळांना खिचडी शिजवण्याचे व पुरवण्याचे कंत्राट ‘नुरैल’ नावाच्या बचतगटाला देण्यात आले असून, त्यांचे स्वयंपाकघर सुर्जी परिसरात आहे. स्वयंपाकघर अन्न व औषध प्रशासनाचा परवाना व सूचना फलक नसतानाही चालवले जात असल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर दोष लपवण्यासाठी स्वयंपाकघर तत्काळ स्वच्छ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तरीही पोषण अधीक्षक शीला आठवले कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे.







