जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच मागून ती स्वीकारताना उत्राण, ता.एरंडोल येथील दोघा तलाठ्यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृवात हा सापळा यशस्वी करण्यात आला.
नरेश भास्कर शिरूड (वय ४१, तलाठी सजा उत्राण अहिर) व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी सजा उत्राण गुजर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आरोपी तलाठी नरेश शिरूड यांनी पकडले होते. मात्र कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे प्रथम २५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. नंतर ही रक्कम वाढवून ३० हजार रुपये करण्यात आली.
या प्रकाराबाबत तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून फक्त ३० हजार घेतो” असे सांगून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
पडताळणीनंतर लगेच सापळा कारवाई राबविण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वर असलेल्या एका खोलीत तलाठी शिवाजी घोलप यांनी तलाठी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत ३०,००० रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.
सापळा कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला –
₹१,७३,३०० रोख रक्कम, Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्कीची बाटली (किंमत ₹२,९५०), Oppo कंपनीचा मोबाईल फोन.
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पो.नि. हेमंत नागरे, पोअं. प्रदीप पोळ, पोअं. अमोल सूर्यवंशी व पोअं. सचिन चाटे सहभागी होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.
.







