जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर तेजस भंगाळे) । शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिवारी नगर परिसरात राहणारे आणि खासगी कंपनीतून निवृत्त झालेले ६१ वर्षीय व्यक्तीने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली. यावेळी दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये शेअर बाजारासंबंधी माहिती देत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. ग्रुपमधून पाठविण्यात आलेल्या लिंकवरून गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा होत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नफा मिळण्याऐवजी सेवानिवृत्ताची मोठ्या रकमेची फसवणूक झाली.
२५ सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्तीने सुरुवातीला ५० हजार रुपये शेअर गुंतवणुकीसाठी ऑनलाइन पाठविले. त्यानंतर अधिक नफा होत असल्याचे सांगत त्यांच्याकडून ७८ लाख ३५ हजार रुपये शेअर खरेदीसाठी घेण्यात आले.यानंतर त्यांच्या खात्यावर ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ३३८ रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच समोरील महिलेने १० टक्के सर्व्हिस टॅक्स भरण्याची मागणी केली. तो टॅक्स भरल्यानंतर पुन्हा १५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरण्यास सांगण्यात आले.
त्यामुळे सेवानिवृत्ताने २६ नोव्हेंबर रोजी ५ लाख रुपये तसेच ३० नोव्हेंबर रोजी ८ लाख २२ हजार ३७५ रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र, त्यानंतरही त्यांना एकही रुपया मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.







