श्री गजानन महाराजांचा ११० वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – श्री गजानन महाराजांचा ११० वा पुण्यतिथी महोत्सव रविवार , दि.२३l८l२०२० (ऋषीपंचमी) ला संपन्न होत आहे . त्यानिमित्याने श्रींचे समाधी सोहळ्या विषयी जाणून घेऊया.
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥
प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥
देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥
पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥
गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥
गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा । विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥
अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥
श्री गजानन महाराज दरवर्षी पंढरपूरची आषाढी वारी करीत असत. सन १९१० साली सुद्धा महाराज आपल्या भक्त मंडळी सोबत पंढरपूरला वारी करीता आले . राऊळात पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले असतांना देवाला म्हणतात
तुझ्या आज्ञेनें आजवर l भ्रमण केलें भूमीवर l जे जे भाविक होते नर l त्यांचे मनोरथ पूर्ण केले ll २९१ ll
जे जे भाविक होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले . परंतु देवा आता माझे अवतार कार्य संपले आहे .त्यामुळे मला आज्ञा असावी.
आता अवतार कार्य संपले l हे तू जाणसी वहिले l पुंडलिक वरदा विठ्ठले l जाया आज्ञा असावी ll २९२ ll
आणि श्रींना श्री विठ्ठलाचा विरह सहन न झाल्याने डोळ्यांत पाणी आले. सोबतच्या मंडळींना काहीच कळत नव्हते . हरी पाटील विचारू लागले , महाराज आम्ही सेवेत काही चुकलो का ?
तिथे कुणालाच काही न सांगता सर्व भक्तांसह महाराज वारी करून शेगावला परत आले.
पुढे श्रावण मास गेला व भाद्रपद महिना आला.तेव्हा श्रींनी आपल्या अवतार कार्य समाप्ती विषयी भक्तांना सांगितले . भक्तांना खूप दुःख झाले .श्री सर्व भक्तांना म्हणाले
दुःख न करावे यत्किंचित् l आम्ही आहों येथे स्थित l तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य l तुमचा विसर पडणे नसे ll ३०७ ll
भक्तांनो अजिबात दुःख करू नका.मला तुमचा विसर पडणारच नाही .तुम्हाला सांभाळण्यास मी येथेच आहे .
मी गेलों ऐंसे मानू नका l भक्तींत अंतर करूं नका l कदा मजलागी विसरूं नका l मी आहे येथेंच ll ३११ ll
श्री गजानन महाराजांनी योगाने प्राण रोधला व भाद्रपद शु.५ (ऋषीपंचमी ) शके १८३२ दि.८l९l१९१० ला श्री समाधीस्त झाले .
पुकार झालीं गांवांत l स्वामी झाले समाधिस्थ l ऐसी ऐकतां मात l हृदय पिटती नारीनर ll ३१६ ll
भक्तांना अतोनात दुःख झाले .सर्वीकडे निरोप पाठविण्यात आले. काही भक्तांना श्रींनी स्वप्नात जाऊन सांगितले . शेगावात श्रींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा अपार मेळा भरला.रथ तयार करण्यात आला .
गावोगावच्या दिंड्या आल्या .संपूर्ण शेगाव नगरीतून ही मिरवणूक निघाली . बायांनी रस्त्यावर सडे घालून रांगोळ्या काढल्या .रात्री दिपोत्सव झाला .विठ्ठल नामाचा गजर होऊ लागला .
तुळशी बुक्का गुलाल फुलें l भक्त उधळू लागले l फुलांखाली झांकून गेले l श्री गजानन महाराज ll ३३८ ll
आणि अशी रात्रभर चाललेली ही मिरवणूक सकाळी श्री समाधी मंदिरात आली .
श्रींनी समाधी घेण्या पूर्वीच , श्रींचे समाधी मंदिर तयार होते .कारण श्रींचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराज यांनी सन १९०७ मध्येच आपली शेवटची इच्छा सांगून, शेगावला श्रींच्या मंदिरा करीता भक्तां कडून शपथ घेतली होती .( ग.वि.अ.११)
म्हणून भक्तांनी श्रींचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराजांच्या इच्छेनुसार , श्रींचे समाधी पूर्वीच त्यांचे भव्य दिव्य असे समाधी मंदिर पूर्वीच तयार केले होते .
सर्वांनी समाधी मंदिरात श्रींचा जयजयकार केला .
जय जय अवलिया गजानना l हे नरदेहधारी नारायणा l अविनाश रूपा आनंदघना l परात्परा जगत्पते ll३४३ll
आणि श्रींना उत्तराभिमूख समाधीत बसविण्यात आले .
शिळा लावून केले द्वार l बंद भक्तांनी शेवटी ll ३४६ ll
अशा प्रकारे हा श्री गजानन महाराज समाधीचा भव्य दिव्य सोहळा पार पडला .
दरवर्षी शेगाव व इतर अनेक ठिकाणी , गावोगावी श्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो . यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला मर्यादा असल्यामुळे , सर्व श्रींचे भक्त आपआपल्या घरोघरीच हा श्रींचा पुण्यतिथी उत्सव साजरा करीत आहेत . दि. २३ l ८l२०२० रविवारी , साजरा होणारा ११० वा समाधी सोहळा , श्रींचे पुण्यतिथी निमित्त श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here