पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । शहरात चारचाकी चोरी करून चोरलेल्या गाड्यांचे सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) करून त्याची विक्री करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या गाड्यांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चिखली आणि मोई परिसरात चालणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
काळेवाडी परिसरातून एका टाटा सुमो गाडीच्या चोरीचा तपास करत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. संबंधित आरोपी पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जात असल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून शिवा मिड्डलाल यादव (वय २०, रा. चिखली) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शिवाची कसून चौकशी केली असता, त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान माहिती समोर आली की, आरोपी शिवा याचे मोई परिसरात ‘शिवा इंटरप्रायजेस’ नावाचे स्क्रॅप सेंटर आहे. तो आपल्या साथीदारासह गाड्या चोरून थेट या सेंटरवर न्यायचा. तिथे अवघ्या काही तासांत गाडीचे इंजिन, टायर आणि इतर पार्ट कापून वेगळे केले जात असत, जेणेकरून गाडीची ओळख पटवणे कठीण होईल. पोलिसांनी या स्क्रॅप सेंटरवर छापा टाकून टाटा सुमो गोल्डसह इतर तीन गाड्यांचे साहित्य जप्त केले आहे
या कारवाईमुळे काळेवाडी, भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांमधील वाहन चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.







