जळगाव महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी बिनविरोध

जळगाव

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जळगाव महानगरपालिकेवर महायुतीकडून महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ‘जीएम फाउंडेशन’ येथे झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली.

राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या महानगरपालिकेत महापौर व उपमहापौरपदाची निवड बिनविरोध होत असल्याने ही घटना विशेष ठरली आहे. या घडामोडीमुळे महायुतीच्या संघटनात्मक ताकदीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
जळगाव महानगरपालिकेच्या ७५ पैकी तब्बल ७० जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) यांचे नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रचंड बहुमतामुळे विरोधकांची भूमिका केवळ औपचारिक ठरली आहे. याच संख्याबळाच्या जोरावर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी महापौर-उपमहापौर निवडीचा पेच अत्यंत कौशल्याने सोडवला. ही निवड आगामी १० महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे.
नावांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. “जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सर्व नगरसेवक एकदिलाने काम करतील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here