सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) | सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरुणाचे नाव सुरंजन शेंडगे असे आहे. तो मूळचा फलटण येथील रहिवासी आहे. रविवारी दुपारी सुरंजन आपल्या मित्रांसोबत सिद्धेश्वर तलावात फिरण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान ही घटना घडली.
सुरंजन हा आपल्या बेलेराव आणि माळवदकर या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. गणपती घाटावरून त्याने पाण्यात उडी मारली आणि त्याचे मित्र मोबाईलवर शूटिंग करत होते. मात्र, पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी बेलेरावने पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतःही बुडू लागला.
हे पाहून माळवदकर याने आरडाओरडा केला, तेव्हा एका होडी चालकाने प्रसंगावधान राखत बेलेराव याचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, सुरंजन पाण्याचा मध्यभागी असल्याने तो खोलवर बुडाला होता. त्याला वाचवता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सलग अडीच तास शोध मोहीम राबवूनही सुरंजनचा पत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सुरंजन हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो सोलापुरात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. तो आपल्या चुलत मावस भावाकडे राहून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.







