जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) । वर्गमित्रांसमोर शिक्षकांच्या उपस्थितीत प्राचार्यांनी मारहाण केल्याच्या मानसिक धक्क्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शहरात रविवारी सायंकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पालकांच्या तक्रारीवरुन संबंधित प्राचार्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदर घटना शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य व सन्मान अबाधित ठेवण्याच्यादृष्टीने चिंताजनक असून, या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील गुलाबराव देवकर इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी अॅण्ड रिसर्चमधील श्याम प्रभाकर पाटील (२०, रा. बोदवड) हा औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी सायंकाळी दौलतनगर परिसरातील राहत्या खोलीत त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली.घटनास्थळी रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा केला असता, श्यामच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत कुठलीही चूक नसताना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांनी वर्गमित्रांसमोर मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या अपमानामुळे व मानसिक तणावातून आपण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे चिठ्ठीत म्हटले होते.
श्यामचे बोदवड येथील पालक आणि नातेवाईक जळगावात दाखल झाले. संबंधित प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर श्यामचे वडील प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्राचार्य पवार यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, शिस्तीच्या नावाखाली होणारे प्रकार आणि शैक्षणिक संस्थांतील वातावरण याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभाविपने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या विद्यार्थ्याला तातडीने न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यासह दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व तक्रार निवारण यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करावी, सर्व महाविद्यालयांमध्ये आचारसंहितेचे कठोर पालन सुनिश्चित करावे आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, अभाविप जळगाव महानगर सहमंत्री वरद पांढारकर यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी केलेल्या स्वाभिमान आंदोलनानंतर अभाविपच्या अभाविपच्या प्राचार्याचे निलंबन व इतर मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत.







