सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) । मिरज शहरात मंगळवारी (दि. १७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास पंचांग पाहण्यास आल्याचा बहाणा करत वयोवृध्द महिलेच्या घरात झालेल्या जबरी चोरीच्या गुन्हाचा अवघ्या १२ तासाच्या आत तपास करत आरोपींना जेरबंद केले आहे. तात्काळ तपासाबद्दल मिरज शहर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिरजमधील ब्राह्णणपुरी भागात कृष्णेश्वर अपार्टमेंट राहणा-या सौ.पद्मा हरिभाऊ जोशी (वय ७५) यांच्या घरात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी पंचांग पाहण्याच्या उद्देशाने प्रवेश मिळवला. घरात येताच एकाने पद्मा यांचे तोंड दाबून दुस-याने त्यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून घेऊन गेले.
याप्रकरणी सौ. पद्मा जोशी यांनी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणील गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास पथकाला प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरुन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक (रा.लिंगनूर, ता.मिरज, जि.सांगली) याने हा गुन्हा आपल्या साथीदारासोबत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला व त्याचा साथीदार राहुल दगडू बनसोडे (रा.लिंगनूर) या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु असून, या आरोपीवर मिरज ग्रामीण पोलीस व कर्नाटक येथे जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत.
सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणील गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सपोनि अण्णासाहेब गादेकर, सपोनि दत्तात्रय पुजारी, सपोनि भैरवनाथ पाटील, सपोफौ निलेश कदम, पोहेकॉं प्रविण वाघमोडे, नितीन मोरे, झाकीर काझी, राजेश गवळी, पोकॉ स्वप्नील नायकोडे, मिलिंद पाटोळे, दिपक परीट, श्रीकांत केंगार, दत्तात्रय राणे, सविता कसबे व सीसीटीव्ही कक्षाचे मपोकॉं आरती शिंदे यांनी यशस्वी केली आहे.







