पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | पारनेर – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून त्यांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन राज्यकारभार केला. मात्र आज त्यांच्या नावावर राजकारण केले जाते, पण शिव विचार मागे पडत चालले आहेत. नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचविण्यासाठी गड-किल्ले संवर्धनाचे शिवकार्य हाती घेतले आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
निलेश लंके प्रतिष्ठान, ‘आपला मावळा’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा व ‘ गड-किल्ले बनवा ’ राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी पार पडले. या कार्यक्रमास खा. लंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रायगडावर १३ वी गड-किल्ले संवर्धन मोहीम
एक दिवस आपल्या राजांसाठी दिला पाहिजे , हा शिवविचार घेऊन आम्ही काम करत आहोत. पर्यटनाच्या माध्यमातून सहकुटुंब गड-किल्ल्यांवर जाऊन महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. गड-किल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत रायगड किल्ला येथे १३ वी मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, ६० ते ७० हजार मावळ्यांच्या सहभागातून राज्यात शिवविचारांचा जागर करण्यात येणार आहे.
खा. नीलेश लंके
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर होते. यावेळी उपसभापती किसनराव सुपेकर, संचालक अशोक कटारिया, मारुती रेपाळे, शकुंतला लंके, नगरसेवक योगीराज गाडे, नाम फाऊंडेशनचे योगेश थोरात, उद्योजक तुकाराम वाखारे, डॉ. आबासाहेब खोडदे, अर्जुन भालेकर, अशोक घुले, कारभारी पोटघन, ॲड . राहुल झावरे, जितेश सरडे, प्रा. संजय लाकुडझोडे, डॉ. बाळासाहेब कावरे, रवींद्र राजदेव, सुभाष शिंदे, सभापती योगेश मते, भूषण शेलार, प्रवीण वारुळे, चंद्रकांत मोढवे, दौलत गांगड, किरण ठुबे आणि इतर पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा. लंके पुढे म्हणाले की , महाराष्ट्राचा इतिहास शिवविचारांचा असताना अनेक गड-किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे. आपण छत्रपतींचे नाव घेतो; मात्र त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे , ही खरी जबाबदारी आहे. केवळ विचार मांडत नाही, तर एक मावळा म्हणून १२ गड-किल्ल्यांची साफसफाई करून संवर्धनाचे प्रत्यक्ष काम सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या दि ८ ते १० मार्च दरम्यान राज्यस्तरीय महाआरोग्य शिबिर अभियान राबविण्यात येणार असून, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी आणि डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील महिला व लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे काम हाती घेतले आहे. आर्थिक व इतर अडचणी येत असल्या , तरी त्यावर मात करत कार्य सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार खा. लंके यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन भालेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जितेश सरडे यांनी केले.







