पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । डिस्काउंटमध्ये मिळणारे शेअर्सचा मोह खराडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलाच भोवला आहे. शेअर्स तर मिळाचे नाही मात्र, त्या नादात त्याची तब्बल १ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक सायबर चोरट्यांकडून झाली आहे. याप्रकरणी, ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांनी फिर्यादींसोबत संपर्क साधून त्यांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून घेतले. त्यानंतर त्यांना डिस्काउंटमध्ये शेअर्स मिळतील तसेच आयपीओ देखील अलॉटमेंट होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल असे प्रलोभन दाखविले. त्यालाच फिर्यादी बळी पडले. त्यांना जाळ्यात खेचण्यासाठी सायबर चोरट्यांनी एका ॲपवर शेअर्स आणि आयपीओमध्ये होणारा नफा दाखवून विश्वास संपादन केला.
त्यानंतर वेळोवेळी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर फिर्यादीने १ कोटी ४९ लाख रुपये जमा केले. दरम्यान, काही दिवसानंतर फिर्यादींना आपण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.







