थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. थेऊर गाव श्रीचिंतामणीस इनाम असून या गावाची सनद औरंगजेबाने दिलेली आहे.
कपिलमुनींना चिंतामणी रत्न मिळवून दिल्यानंतर विनायकाने येथेच वास्तव्य केले, अशी अख्यायिका आहे. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. अभिजीत नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी गुणवती. त्यांचा मुलगा गण. हा गण त्यांना रानावनात तपश्चर्या केल्यानंतर झाला. तो मोठा झाल्यानंतर जेवढा पराक्रमी झाला तेवढाच तापट होता. एकदा तो कपिलमुनींच्या आश्रमात गेला. त्यांच्याकडे चिंतामणी रत्न होते. या रत्नाच्या सामर्थ्याने त्यांनी त्याला भोजन इत्यादी दिले. गणाला या रत्नाचा मोह झाला आणि त्याने मुनींना रत्न मागितले. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. गणाने कपिलमुनींकडील चिंतामणी रत्न चोरले. याचे मुनींना अतिशय वाईट वाटले. त्यांनी विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाले आणि त्यांनी कपिलमुनींना त्यांचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे वचन दिले.
चिंतामणी रत्न मिळविण्यासाठी विनायकाला गणासोबत युद्ध करावे लागले. विनायकाने गणाला ठार केले. मग त्याचा पिता राजा अभिजीतने विनायकाला ते चिंतामणी रत्न परत केले. विनायक ते रत्न देण्यासाठी कपिलमुनींकडे गेला. मात्र, त्यांनी ते रत्न स्विकारले नाही आणि ते विनायकालाच अर्पण केले. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले आणि ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच वास्तव्य केले. दुसरी अख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यांची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी त्यांना ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्या जागेला त्यांनी स्थावर असे नाव दिले तेच हे थेऊर. थेऊरचे मंदिर भव्य व सुंदर आहे. या मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. चिंचवडचे चिंतामणी देव यांनी त्याकाळी चाळीस हजार रुपये खर्चून हे मंदिर बांधले. १०० वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर आणि सभागृह बांधले. हे मंदिर लाकडापासून बनविले आहे. मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. तो अलिकडच्या काळातील आहे. श्री चिंतामणी डाव्या सोंडेचा असून पूर्वाभिमुख आहे. सुंदर, सुबक आणि रेखीव अशी ही मूर्ती आहे. येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव साजरा केला जातो. याशिवाय संकष्टी आणि अंगारकीला श्रीचिंतामणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
असा हा अष्टविनायकातील दुसरा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी







