चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

खान्देश महोत्सवात

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : खान्देशी संस्कृतीचा वारसा, जिभेवर रेंगाळणारी चव आणि लोकोत्सवाचा जल्लोष… याचेच मूर्तिमंत रूप म्हणजे जळगाव महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘खानदेश महोत्सव २०२६’… सध्या हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता जळगावकरांच्या आनंदाचा आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

महापौरांची ‘सादगी’ अन् आपुलकीचा संवाद
रविवार, १ मार्चच्या सायंकाळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी महोत्सवाला भेट दिली. एखाद्या लोकप्रतिनिधीप्रमाणेच नव्हे, तर घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण महोत्सवाचा फेरफटका मारला. विविध महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेटी देऊन त्यांनी महिलांच्या कष्टाचे आणि कौशल्याचे कौतुक केले.
स्वच्छतेचे आणि नियोजनाचे ‘कौतुक’
महोत्सवातील चकचकीतपणा पाहून महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाचे पाठ थोपटले. स्वच्छतेचा दर्जा पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. “उत्सव साजरा करताना शहराची शिस्त आणि स्वच्छता जपली जाणे हे जळगावच्या सुजाणपणाचे लक्षण आहे,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांना शाबासकी दिली, तसेच कचरा व्यवस्थापनाबाबत अधिक सजग राहण्याच्या सूचनाही केल्या. कचरा भरलेले ड्रम वेळोवेळी रिकामे करत चला, असे त्यांनी सांगितले.
चवीचा प्रवास : कुरकुरीत मिरची ते आईस्क्रीम
महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या वासाने संपूर्ण परिसर दरवळला होता. महापौरांनी देखील या ‘खाद्ययात्रे’चा मनमुराद आनंद लुटला. भुसावळची शान कुऱ्हा येथील प्रसिद्ध तिखट झणझणीत मिरची, चटपटीत दाल पकवान आणि पंजाबी डिशेस, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे लाडके ‘आलू पोंगे’, तांदूळ-नागलीची खिची आणि शेवट गोड करण्यासाठी थंडगार आईस्क्रीम विकत घेऊन त्यांनी आस्वाद घेतला.
आईस्क्रीमचा आस्वाद घेताना महापौरांनी तिथे आलेल्या चिमुकल्यांना आईस्क्रीम खाऊ घातले. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून महोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी महापौरांना अनेक ओळखीचे चेहरे आणि माहेर-सासरची माणसे भेटल्याने गप्पांचा जणू ‘महोत्सवच’ तिथे भरला होता. यामुळे नात्यांची वीण आणखीनच घट्ट जपली गेली.
“असे महोत्सव वारंवार व्हावेत : जळगावकरांचा सूर
महापौरांचा साधेपणा पाहून नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती विचारताना महापौरांच्या डोळ्यांत असलेली आत्मीयता उपस्थितांना भावली. “खूप सुंदर नियोजन आहे, जळगावला अशा ऊर्जेची गरज आहे. वर्षातून किमान २-३ वेळा असे सोहळे व्हावेत,” अशी मागणी यावेळी नागरिकांनी उत्साहाने केली.
विक्रमी गर्दीचा ओघ
खान्देशी अस्मितेचा हा डंका किती मोठा आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ३५ हजारांहून अधिक पर्यटकांनी महोत्सवाला हजेरी लावली आहे. बचत गटांच्या वस्तूंची रेलचेल आणि खान्देशी खाद्यसंस्कृतीचा मिलाफ यामुळे हा महोत्सव जळगावच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here