जागतिक महिला दिन विशेष : उद्योग क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व : सौ. नीलम बेंगडे पाटील

जागतिक महिला दिन

पारनेर (उपसंपादक दिपक भिका वरखडे) । जागतिक महिला दिन , हा स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आणि सामर्थ्याचा गौरव करणारा दिवस आहे. आज विविध क्षेत्रांत महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. उद्योग क्षेत्रात धाडसाने पुढे येत ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी घेणाऱ्या सौ. नीलम बेंगडे पाटील यांचे कार्य , हे अशाच प्रेरणादायी प्रवासाचे उदाहरण आहे.

पुणे जिल्ह्यातील अवसरी या ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात शिक्षण घेताना करिअर विषयी विशेष मार्गदर्शन उपलब्ध नसतानाही त्यांनी जिद्द सोडली नाही. बारावीनंतर डी.एड. पूर्ण केले; मात्र केवळ नोकरीत स्थिरावण्या ऐवजी त्यांनी पुढील शिक्षण घेत स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. व्यवसाय करत असताना एम.बी.ए. चे शिक्षण सुद्धा ते घेत आहेत.
उद्योजक विकास बेंगडे पाटील यांच्याशी विवाहानंतर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. पतीच्या प्रोत्साहनाने आणि परस्परांवरील दृढ विश्वासाच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. दोघांनी मिळून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी उभी केली.जागतिक महिला दिन
वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत ३० शाखांचे जाळे उभारण्यात आले. सुमारे ४० हजार समाधानी ग्राहक, २०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी आणि सुमारे २१० कोटी रुपयांच्या ठेवी असा भक्कम पाया या संस्थेने निर्माण केला आहे. विशेष म्हणजे संस्थेत ६० टक्के महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिलाही वित्त व्यवस्थापन आणि प्रशासनात सक्षम नेतृत्व करू शकतात, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. युवक उद्योजकांना अर्थसहाय्य, कौशल्यविकास आणि योग्य मार्गदर्शन देत त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्यही या संस्थेमार्फत केले जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील भक्कम पाऊल 
बेंगडे पाटील दांपत्यांनी स्थापन केलेल्या व्ही बी पी ग्रुप ऑफ कंपनीअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात आहेत. ५१३ एकर क्षेत्रात साकारला जाणारा , “कोकण वैभव निसर्ग ”, वृक्षलागवड प्रकल्प, लाडघर समुद्रकिनारी उभारण्यात येणारे 164 एकर मधील बंगलो प्लॉटिंग वारा प्रकल्प व पंचतारांकित दर्जाचे रिसॉर्ट , गुहागर येथील ५२ एकर क्षेत्रातील करीसा प्रकल्प , या सर्वांमध्ये नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची जबाबदारी सौ. नीलम बेंगडे पाटील यांनी समर्थपणे सांभाळली आहे. पारदर्शक व्यवहार, ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार सेवा ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. अल्पावधीतच हजारो कोटी रुपयांच्या किमतीचे व्यावसायिक साम्राज्य उभे करण्यात या दांपत्याने यश संपादन केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व
व्यवसायाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी श्री. गुरुदेव दत्त फाउंडेशन ची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून सौ नीलम बेंगडे पाटील यांनी त्यांच्या कुरवंडी ता. आंबेगाव जि. पुणे या मूळ गावी श्री दत्त महाराजांचे भव्य असे मंदिर बांधले आहे, त्यातून धार्मिक भावना वृंदिगत होण्यास मदत होणार आहे, महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि सेवा क्षेत्रात संधी निर्माण करणे , अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना हार्दिक प्रशिक्षण देणे व अर्थनियोजन शिकवणे ही कामे केली जातात.
दि ७ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे आणि ग्रामीण भागातील १०० पेक्षा अधिक महिलांना आर्थिक राजधानी मुंबईची शैक्षणिक सहल घडवून आणण्यात आली. ४५ पेक्षा अधिक पर्यटन स्थळांना भेट देत ग्रामीण महिलांना नव्या संधींची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, दृष्टी आणि प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सौ. नीलम बेंगडे पाटील यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिलांसाठी आशेचा किरण आहे. योग्य ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न, परस्पर विश्वास आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांच्या जोरावर महिला उद्योग क्षेत्रातही मोठी झेप घेऊ शकतात, याचे त्या जिवंत उदाहरण आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला सलाम आणि नव्या पिढीतील महिलांनीही उद्योग क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकावे, हीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here