पारनेर (उपसंपादक दिपक भिका वरखडे) । अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे आगामी गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी भव्य ‘हळदी-कुंकू’ समारंभ आणि क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जय जिजाऊ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई सोबले यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडणार असून, यामध्ये तालुक्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिल्या सात विजेत्यांना मिळणारी मानाची पैठणी आणि भरघोस बक्षिसे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक बाईक, द्वितीय क्रमांकासाठी फ्रिज आणि तृतीय क्रमांकासाठी टीव्ही देण्यात येणार आहे. त्यासोबतच शिलाई मशीन, मोबाईल, सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला अशी आकर्षक बक्षिसे अनुक्रमे चौथ्या ते सातव्या क्रमांकाच्या विजेत्यांना पैठणीसह प्रदान केली जातील. विशेष म्हणजे, या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आयोजकांतर्फे आकर्षक साडी भेट दिली जाणार आहे.
कार्यक्रमात केवळ मुख्य स्पर्धाच नव्हे, तर २१ विविध वस्तूंचा ‘बंपर लकी ड्रॉ’ देखील काढला जाणार आहे. यामध्ये पिठाची गिरणी, स्मार्ट वॉच, मिक्सर, डिनर सेट, इस्त्री आणि मोबाईल अशा गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. हा सोहळा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हळदी-कुंकू समारंभाने सुरू होईल आणि त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत ‘होम मिनिस्टर’चा खेळ रंगणार आहे. कान्हूर-पारनेर रोडवरील खंडोबा मंदिरासमोरील प्रांगणात हा सोहळा संपन्न होईल.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित महिला व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाची सोय करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात सोबलेवाडी आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सुनिताताई सोबले यांनी केले आहे.







