आमोदे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर उत्साहात संपन्न

महसूल

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) । महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दिनांक 7 मार्च रोजी बामणोद मंडळातील आमोदे (ता. यावल) येथे उत्साहात पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी (महसूल) जळगाव विजय ढगे यांच्या हस्ते तर तहसीलदार यावल मोहनमाला नाझिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. पुरवठा शाखेमार्फत 142 नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप करण्यात आले. संगायो शाखेतून 327 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून 99 हयात प्रमाणपत्रे व 12 नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले. सेतु शाखेमार्फत 242 उत्पन्न दाखले, 71 राष्ट्रीयत्व दाखले, 69 रहिवासी दाखले, 26 जातीचे दाखले वितरित करण्यात आले. तसेच 21 आधार नोंदणी व 55 आधार दुरुस्ती करण्यात आल्या.
पंचायत समितीमार्फत 2 जलतारा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बालविकास विभागाने 6 लाभार्थ्यांना बेबी किट वाटप केले. तालुका आरोग्य विभागामार्फत जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 8 लाभार्थ्यांना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 4 लाभार्थ्यांना, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 11 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत 46 लाभार्थ्यांना लाभ, कृषी विभागाकडून फळबाग लागवड योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांना, तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत 1 लाभार्थ्यास लाभ देण्यात आला.
शिबिराच्या ठिकाणी विविध शासकीय विभागांनी माहितीपर स्टॉल उभारून नागरिकांना योजनांची माहिती दिली. या शिबिराला सुमारे 500 ते 600 नागरिकांची उपस्थिती लाभली असून शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजय ढगे व तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई (मंडळ अधिकारी, बामणोद) यांनी केले तर अतुल गांगुर्डे (नायब तहसीलदार) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here