जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । शहरात अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या टोळीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य विक्रेत्यासह एकूण सात संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ गावठी बंदुका तसेच १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी, असा सुमारे तीन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जळगाव शहरातील इंडिया गॅरेज परिसरात एक व्यक्ती अवैधरित्या गावठी बंदूक बाळगून फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने इंडिया गॅरेज परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती दिसताच त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे एक गावठी बंदूक आढळून आली. चौकशीत त्या व्यक्तीचे नाव यश रामदास ननवरे (२७, रा. धनगर बिल्डिंगजवळ, जळगाव) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीबाबत अधिक चौकशी केल्यावर या अवैध शस्त्र व्यवहारात इतर संशयितांच्या टोळीचाही सहभाग असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी पुढील तपास करत केशव सुनील भालेराव (२३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), गौरव देविदास साळवे (२२, रा. पिंप्राळा, जळगाव), समाधान बळीराम निकम (४०, रा. अंजाळा, ता. यावल), विकास प्रकाश काकडे (२८, रा. साळसिंगी, ता. बोदवड), जगदीश गजानन महाजन (२०, रा. शाहपूर, जि. बऱ्हाणपूर) आणि कैलास राजेंद्र माळी (२०, रा. बोरकुंड, जि. धुळे) यांना अटक केली.







