सोलापूर जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा नाही; प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांचे आवाहन

जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे. नागरिकांनी अनावश्यक भीतीपोटी इंधनाची साठवणूक करू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रशासनाचे नियोजन आणि पुरवठा स्थिती
जिल्हा प्रशासनाने बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL) आणि आयओसीएल (IOCL) या प्रमुख तेल व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आहे. जिल्ह्यात मागणीनुसार पुरवठा साखळी सुरळीत असून, गॅस वितरण नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने समन्वय अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही घेतली आहे.

“जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी पॅनिक बुकिंग (Panic Booking) टाळावे. प्रशासकीय नियमांचे पालन करून सहकार्य करावे.”
– कुलदीप जंगम,
प्रभारी जिल्हाधिकारी, सोलापूर.

जिल्ह्यातील गॅस यंत्रणा एका दृष्टीक्षेपात:
एकूण गॅस एजन्सी: ९४ (BPCL- ५४, HPCL- २०, IOCL- २०)
घरगुती ग्राहक संख्या: ११,८८,२५८
व्यावसायिक ग्राहक संख्या: १०,८००
दैनंदिन गरज: २५० मेट्रिक टन (घरगुती), १० मेट्रिक टन (व्यावसायिक)

गॅस वितरणातील महत्त्वाचे बदल आणि नियम
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीमुळे गॅस वितरणाच्या नियमांत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत:. व्यावसायिक बुकिंग बंद: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे बुकिंग तात्पुरते पूर्णतः बंद करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालय, शासकीय संस्था, एनटीपीसी आणि अन्नछत्र मंडळांना यातून सूट देण्यात आली आहे., प्रतीक्षा कालावधी: घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगनंतरचा प्रतीक्षा कालावधी आता २५ दिवसांचा करण्यात आला आहे., अनिवार्य पडताळणी: गॅस वितरण करताना कंपनीकडून प्राप्त होणारा OTP पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल.
काळाबाजारावर प्रशासनाची नजर
गॅस सिलेंडरचा अवैध साठा किंवा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके गॅस एजन्सींच्या दैनंदिन आवक-जावक नोंदवहीची तपासणी करतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here