समतेच्या विचारांनी विकसित महाराष्ट्राची वाटचाल – आमदार मोनिकाताई राजळे

आमदार मोनिकाताई राजळे

अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार सीमाताई हिरे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, गणेश रांधवने, राहुल नांगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महिलांना शिक्षणासह समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांनी सुरू केलेली शिक्षणाची क्रांती आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात समतेच्या विचारांवर आधारित विकासकामे सुरू आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देत महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, महिलांचे सशक्तीकरण हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असून, प्रत्येक समाजघटकाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य सरकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले या केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर त्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या. त्यांनी समाजातील अज्ञान, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवून शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या कार्यामुळे आज समाजातील महिलांना शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा हक्क मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here