जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | वातावरणात उष्णता वाढली असून, सूर्य आग ओकत आहे. उष्णता वाढल्याने आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आज जळगाव पोलीस मुख्यालयातील स्टोअररुमलाच आग लागून महत्वाची कागदपत्रे, स्टेशनरी व बंदोबस्ताचे साहित्य जळून खाक झाले आहे.
पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस दलासाठी लागणारी स्टेशनरी आणि बंदोबस्ताचे साहित्य साठवून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खोली (स्टोअर रूम) आहे. आज अचानक या खोलीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळेवर पोहोचण्यामुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, आग विझवेपर्यंत खोलीतील बहुतेक साहित्य जळून राख झाले होते.
या आगीमुळे पोलिसांच्या दैनंदिन कामासाठी लागणारी स्टेशनरी, महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगण्यात येत आहे.
पोलीसांकडून या घटनेचा सविस्तर पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आणि कोणती महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली, याचा तपशील समोर येईल.







