पंढरपूर (तालुका क्राइम रिपोर्टर प्रकाश इंगोले) | आगामी वारी, यात्रा आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कंबर कसली आहे. शनिवारी, ९ मे २०२६ रोजी पोलिसांनी मौजे पोहोरगाव आणि शेगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १५ हजार २०० रुपयांचा देशी-विदेशी दारू साठा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आगामी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पोहोरगाव आणि शेगाव या ठिकाणी अवैध दारू साठ्यावर ‘रेड’ केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्रीसाठी साठवून ठेवलेला १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये: १. बंडू यासीन सय्यद (वय ५२, रा. पोहोरगाव) २. नरेश सुरेश दुध्दम (वय ४०, रा. शेगाव) या दोघांचा समावेश असून, त्यांच्याकडे अधिक तपास पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, आबासाहेब शेंडगे, पोलीस हवालदार गावडे, सुजित उबाळे, सुभाष देशमुख, दीपक भोसले आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाचा सहभाग होता. तालुका पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध ही कठोर भूमिका घेतल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.







