सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । बार्शी शहर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे एका माउलीची आपल्या हरवलेल्या काळजाच्या तुकड्याशी पुनर्भेट झाली आहे. बस स्थानकावर गर्दीत चुकलेल्या पाच वर्षीय बालकाला शोधून पोलिसांनी सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास बार्शी बस स्थानकावर एक पाच वर्षांचा मुलगा कोणाची तरी वाट पाहत रडत उभा असल्याची माहिती ‘डायल ११२’ च्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. मुलासोबत कोणीही नातेवाईक नसल्याचे समजताच कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मोहन कदम यांनी ही बाब पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या कानावर घातली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कुकडे यांच्या सूचनेनुसार मोहन कदम यांनी तातडीने बस स्थानक गाठले. त्या घाबरलेल्या मुलाला विश्वासात घेऊन त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. खाऊ आणि पाणी देऊन मुलाला बोलते केले असता, त्याने आपले नाव अदिराज औदुंबर कुंभार असल्याचे सांगितले.
“नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी प्रवासादरम्यान मुलांच्या हाताला धरून राहावे आणि त्यांची विशेष दक्षता घ्यावी, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.”
– श्री. बालाजी कुकडे (पोलीस निरीक्षक, बार्शी शहर)
मुलाच्या पालकांचा ठावठिकाणा लावण्यासाठी पोलिसांनी स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. अवघ्या काही वेळातच पोलिसांना मुलाच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला. मुलाची आई दिपाली औदुंबर कुंभार (रा. कसाई, ता. तुळजापूर) या तातडीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्या.
आपला मुलगा सुरक्षित असल्याचे पाहताच दिपाली कुंभार यांना अश्रू अनावर झाले. पोलीस ठाण्यातच माय-लेकाची ही भावनिक भेट पाहून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आईचे सांत्वन करत, “प्रवासादरम्यान लहान मुलांची विशेष काळजी घ्या,” असा मोलाचा सल्ला देऊन अदिराजला त्यांच्या स्वाधीन केले.
पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राऊत (पोकाँ/१५३), मोहन कदम (पोकाँ/४१२) आणि वैभव भांगे (पोकाँ/९१८) यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली.







