सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा शहराच्या हृदयस्थळी असलेल्या शनिवार पेठ, माळी गल्ली भागात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरने फोडले. या चोरीत चोरट्यांनी ७ लाख ७२ हजार ९०० रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला असून, कटरच्या वापरामुळे लागलेल्या आगीत एटीएम मशीनसह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना ७ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने एटीएम कक्षाच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. कल्पकतेने आणि पूर्वतयारीने आलेल्या चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनचे लॉकर कापले. मशिनमधील कॅश ट्रे बाहेर काढून त्यातील ५०० रुपयांच्या १३३२ नोटा (६,६६,००० रुपये) आणि १०० रुपयांच्या १०६९ नोटा (१,०६,९०० रुपये) असा एकूण ७ लाख ७२ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
गॅस कटरने मशीन कापताना उष्णतेमुळे एटीएम केंद्रात भीषण आग लागली. या आगीत एटीएम मशीन, वातानुकूलित यंत्र (AC) आणि सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा कटरच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी ‘सीएमएस इन्फो सिस्टिम्स’चे असिस्टंट मॅनेजर भिकाजी संभाजी लिमकर (रा. उचगाव, कोल्हापूर) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(A) आणि ३२४(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या पोलीस उपनिरीक्षक पिसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे मंगळवेढेकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.







