कजगाव (तालुका प्रतिनिधी अमीन पिंजारी): येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने सन २०२५-२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेत सलग १०० टक्के निकालाची आपली गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या संस्थेने आपल्या उल्लेखनीय यशाने तालुक्यासह संपूर्ण पंचक्रोशीत मानाचे स्थान निर्माण केले आहे.
यंदा शाळेतून एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. निशाबेन परेशभाई सितापरा: ९४.६०% (शाळेत प्रथम), कु. हर्षदा सुभाष परदेशी: ९३.६०%, कु. नुपूर देविदास पाटील: ९३.२०%, चि. हर्षवर्धन दीपक पाटील: ९२.८०%, चि. आदित्य भूषण पाटील: ९१.४०%, चि. माज रहीम खाटीक: ९१.४०%, चि. ललित दीपक पाटील: ९१.००%, चि. उमेश ज्ञानेश्वर महाजन: ९०.८०%, चि. लोकेश अनिल पाटील: ९०.२०% तसेच चि. प्रथमेश ओमप्रसाद धाडीवाल (८९.८०%) व चि. अनस अमिन पिंजारी (८९.४०%) यांनीही विशेष प्राविण्य मिळवून शाळेच्या यशात भर घातली आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव नंदकुमार चव्हाण, मुख्याध्यापक प्रदीप कुमावत आणि सर्व शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. गुणवत्ता, शिस्त आणि आधुनिक शिक्षणपद्धतीच्या जोरावर शाळेने परिसरात एक विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







