जळगाव (संपादक सुनिल पाटील) । शिवसेनेचे (शिंदे गट) शिव वाहतूक सेना जिल्हाप्रमुख नंदुआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचे रक्षण आणि महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिसरातील वाहतूक व्यावसायिक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना नंदुआप्पा पाटील म्हणाले की, “महापुरुषांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज असून, वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमातून आपण खऱ्या अर्थाने समाजाचे देणे लागतो.”
वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी या भागात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, या झाडांच्या संवर्धनाची आणि त्यांना जगवण्याची जबाबदारीही शिव वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
याप्रसंगी पद्माकर निकम, प्रमोद आमोदकर, अनिल पाटील, राजु चौधरी, संजय चौधरी यांच्यासह शिव वाहतूक सेनेचे विविध पदाधिकारी, चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. नंदुआप्पा पाटील यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







