पिंपरी-चिंचवडच्या कामगारनगरीचा डंका; कबीरजी राहुल कांबळे यांची UPSC परीक्षेत देशात १२५ वी रँक

कबीरजी राहुल कांबळे

पिंपरी-चिंचवड (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारनगरीत राहणाऱ्या एका कष्टकरी कामगाराच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कबीरजी राहुल कांबळे यांनी या अत्यंत कठीण परीक्षेत संपूर्ण भारतात १२५ वा क्रमांक (रँक) पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी कबीरजी कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप दिली.

 

कबीरजी यांच्या यशाचा गौरव करताना शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले म्हणाले, “कष्टकरी कामगाराच्या घरातून आलेल्या मुलाने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत १२५ वी रँक मिळवणे, ही पिंपरी-चिंचवड शहर व संपूर्ण बहुजन समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कबीरजी यांनी आपल्या कर्तृत्वातून हे दाखवून दिले आहे की, गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि संसाधनांचा अभाव हा यशाच्या मार्गात कधीही अडथळा ठरू शकत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा आणि बहुजन समाजातील महापुरुषांचा वारसा चालवणारा हा खरा सुपुत्र आहे.”

युवराज दाखले यांनी पुढे बोलताना सांगितले की, कामगारनगरीतील सर्वसामान्य घरातून सुरू झालेला आणि दिल्लीच्या प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचलेला कबीरजींचा हा प्रवास थक्क करणारा आणि लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आई-वडिलांनी अतोनात कष्ट आणि मोलमजुरी करून मुलाला शिकवले आणि मुलानेही त्यांच्या कष्टाचे चीज करत त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले, हा क्षण भावुक करणारा आहे.

“शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेनेच्या वतीने कबीरजी कांबळे यांचा लवकरच शहरात जाहीर नागरी सत्कार करण्यात येईल. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील UPSC व MPSC ची तयारी करणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी कबीरजींचे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाईल. आपल्या बहुजन समाजातील मुलांनी प्रशासनात उच्च पदांवर (कलेक्टर, एसपी, कमिशनर) जावे, हेच महापुरुषांचे स्वप्न होते आणि ते कबीरजींनी आज साकार केले आहे,” असा विश्वासही युवराज दाखले यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here