जळगाव (संपादक सुनिल पाटील) | शहर महानगरपालिका प्रशासनाने चौक आणि रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली व्यावसायिक कंपन्यांशी हातमिळवणी करून स्वतःचे खिसे भरल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी केला आहे. या सुशोभीकरणाच्या कामांमुळे महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित कंपन्यांचा मात्र फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या चंबुतराखाली असलेले ‘अदाणी’ कंपनीचे नाव तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा ते रेल्वे स्टेशन, तसेच गोविंदा रिक्षा स्टॉप आणि नटवर सिनेमा थिएटरपर्यंतच्या रस्ते विभाजक (डिव्हायडर) व चौक सुशोभीकरणाचे काम ओरिएंट कंपनीला (अदाणी सिमेंट) गेल्या २० वर्षांपासून देण्यात आले आहे. मनपाच्या करारानुसार कंपनीने केवळ सुशोभीकरण करणे आणि तिथे जाहिरात फलक लावणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने मनमानी कारभार करत तिथले सर्कल तोडून लहान केले आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
“मनपाने हे रस्ते कंपनीला आंदण दिल्यासारखी आणि कंपनीने ते विकत घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा संताप लाडवंजारी यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा उभारण्यात या कंपनीचे कोणतेही योगदान नसताना, कंपनीने थेट नेहरूंच्या पुतळ्याच्या चंबुतराखाली स्वतःच्या कंपनीचे नाव असलेला ग्रेनाईटचा दगडी फलक फिक्स केला आहे. जाहिरातीच्या या अघोरी पद्धतीमुळे पुतळ्याचे विद्रुपीकरण झाले आहे.”
पुतळ्याच्या चंबुतराखालील कंपनीचे नाव असलेला हा दगडी फलक महानगरपालिकेने तात्काळ काढून टाकावा, अशी मागणी लाडवंजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. हा फलक न हटवल्यास महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या मागणीचे निवेदन देताना माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यासोबत सुनील भैय्या माळी, राजुभाऊ मोरे, किरणभाऊ राजपूत, मजहरभाई पठाण, रिंकू चौधरी, सुहास चौधरी, भल्ला तडवी, रहिम तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.







