नाशिक (उपसंपादक चांगदेव पवार) | नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला येथील त्र्यंबक रस्त्यालगत असलेल्या प्रसिद्ध गोरक्ष धाम मंदिरात दिवसाढवळ्या चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून थेट दानपेटीवर डल्ला मारत हजारो रुपयांची रोकड लंपास केली आहे. भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
सुमारे ४५ वर्षांची मोठी धार्मिक परंपरा लाभलेल्या या गोरक्ष धाम मंदिरात नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद-भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, याच गर्दीचा आणि वर्दळीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अतिशय चलाखीने मंदिरातील दानपेटी फोडली आणि त्यातील मोठी रक्कम घेऊन फरार झाले.
मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून मंदिराची ही दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. उत्सव आणि नियमित येणाऱ्या भाविकांमुळे या दानपेटीत अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम जमा असावी, असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला आहे. चोरट्यांनी ही सर्व रक्कम लंपास केली आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिराची पाहणी करून रीतसर पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी मंदिर परिसर आणि त्र्यंबक हायवेवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे.
अतिशय शांत आणि वर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या चोरीची ही धाडसी घटना घडल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस प्रशासन या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांना गजाआड करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







