सांगली (जिल्हा संपादक संजय तोडक) | सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सराईत आणि ‘मोक्का’ गुन्ह्यातील फरार हैदरअली सरफराज कायम (वय २९ वर्षे, रा. इराणी इमाम बाडा, मुंब्रा, ता. व जि. ठाणे) या आंतरराज्यीय चैन स्नॅचरला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली महागडी दुचाकी असा एकूण २,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सांगली ग्रामीण व बृहन्मुंबई पोलीस ठाण्यांमधील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ज्योती वृषभ उपाध्ये (वय ४७, रा. पाटील गल्ली, अंकली, ता. मिरज, जि. सांगली) या अंकली रेल्वे ब्रिजजवळून पायी घरी चालल्या होत्या. त्या दरम्यान, पाठीमागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे जण वेगाने आले. दुचाकी चालवणाऱ्याने तोंडाला मास्क लावला होता, तर पाठीमागे बसलेल्या इसमाने आतमध्ये पॅन्ट आणि वरून पूर्ण बुर्खा परिधान केला होता. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून (चैन स्नॅचिंग करून) तिथून पळ काढला होता. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांची दखल घेत सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नियुक्त केले.
तपास सुरू असताना, दिनांक २२ मे २०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर आणि विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. अंकली येथील चैन स्नॅचिंगचा हा गुन्हा मोक्का प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपी हैदरअली सरफराज कायम याने त्याचे साथीदार इम्रान इराणी (रा. गुंटकल, आंध्र प्रदेश) आणि सादक इराणी (रा. गदग, कर्नाटक) यांच्या मदतीने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच, आरोपी हैदरअली हा नागपूर-रत्नागिरी हायवेवरील विठ्ठल पॉलिटेक्निक कॉलेजच्या ब्रिजखाली येणार असल्याचे समजले. माहिती मिळताच पोलिसांनी तिथे दबा धरून सापळा रचला आणि हैदरअलीला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी हैदरअलीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ९ ग्रॅम वजनाचे चोरीचे मंगळसूत्र आणि एक यामाहा कंपनीची ‘एमटी १५’ मोटारसायकल मिळून आली. कसून चौकशी केली असता, हे मंगळसूत्र अंकली ब्रिजजवळून चोरल्याची त्याने कबुली दिली.
तसेच, गुन्ह्यात वापरलेली ही दुचाकी त्याचा साथीदार इम्रान इराणीची असून, त्याबाबत अधिक तपास केला असता ती २०२४ साली बृहन्मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले (बृहन्मुंबई पो. ठाणे गु.र.नं. ७८७/२०२४). सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त केला. त्याच्याजवळून २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल १,४०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे ९ ग्रॅमचे मंगळसूत्र, ८०,०००/- रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची ‘एमटी १५’ मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे, एलसीबी अंमलदार : सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप नलावडे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, अमीरशा फकीर, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतीराम खोत, दरीबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, महादेव नागणे, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील. यांनी यशस्वी केली.
पकडण्यात आलेला आरोपी हैदरअली हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे नोंद आहेत. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.







