सांगली (जिल्हा संपादक संजय तोडक) | सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका आंतरराज्यीय अट्टल दुचाकी चोरटा रणजित श्रीरंग लोखंडे (वय २४ वर्षे, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. कागवाड, जि. बेळगाव) याला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण ५,३०,०००/- रुपये किमतीच्या ९ वेगवेगळ्या मोटारसायकली जप्त केल्या असून, सांगली, मिरज आणि कर्नाटक राज्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
दिनांक २३ मे २०२६ रोजी हे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करत असताना, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सपोफौ) अमित परीट यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत एक खात्रीशीर माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित लोखंडे याने वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या मोटारसायकली सांगलीतील वसंतदादा मार्केट परिसरातील महेश कबाडे यांच्या दुकानामागे लपवून ठेवल्या असून, तो आज त्यातील एक गाडी विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. कबाडे यांच्या दुकानामागे पाळत ठेवली असता, एक संशयित तरुण तेथून दुचाकी काढून पळून जाण्याच्या तयारीत होता. पथकाने कोणतीही संधी न देता त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने आपले नाव रणजित लोखंडे असे सांगितले.
सुरुवातीला आरोपीने गाडीच्या कागदपत्रांबाबत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने १७ मे २०२६ च्या रात्री विश्रामबाग परिसरातील मालगांवे डेअरी समोरून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे आरटीओ नंबर नसलेल्या इतर दुचाकी लपवून ठेवल्याचे आढळून आले. आरोपीने मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड तसेच कर्नाटक राज्यातील कागवाड, कुडची आणि चिंचली भागातून या दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
आरोपीच्या अटकेमुळे पोलीस दप्तरी नोंद असलेले विश्रामबाग पोलीस ठाणे: गु.र.नं. १४५/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)), मिरज शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६८/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)), मिरज शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. १९०/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)), एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे: गु.र.नं. १२५/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)), एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे: गु.र.नं. २६४/२०२४ (भादविसं कलम ३७९), मिरज ग्रामीण पोलीस ठाणे: गु.र.नं. २५८/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)), कागवाड पोलीस ठाणे (कर्नाटक राज्य): गु.र.नं. १४२/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)) हे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी त्याच्याजवळून ५ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या हिरो कंपनीच्या ‘स्प्लेण्डर प्लस’ मॉडेलच्या ६ काळया रंगाच्या मोटारसायकली (प्रत्येकी किंमत ₹६०,०००/-), हिरो कंपनीची ‘एच एफ १००’ काळ्या रंगाची १ मोटारसायकल (किंमत ₹६०,०००/-), हिरो कंपनीची ‘एच एफ डिलक्स’ काळ्या रंगाची १ मोटारसायकल (किंमत ₹६०,०००/-), सुझुकी कंपनीची (यामाहा कंपनीचे अॅक्सेसीरीज लावलेली) १ मोटारसायकल (किंमत ₹५०,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत.
ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली), गुन्हा अन्वेषण विभागाचे अमित परिट, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, सायबर पोलीस ठाणे पथकातील अभिजीत पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांनी केली.
अटक करण्यात आलेला आरोपी रणजित लोखंडे हा रेकॉर्डवरील आंतरराज्यीय गुन्हेगार असून पुढील तपासासाठी त्याला जप्त मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.







